मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या २२ वर्षांपासून लोकशाही मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून तर आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आम्ही कधीही नियमांचा भंग केलेला नाही. न्यायदेवता नक्कीच गोरगरिबांच्या बाजूने न्याय करेल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.२) दिली.
ते पुढे म्हणाले, न्यायालय म्हणजे गरीबांच्या वेदनांची दखल घेणारे मंदिर आहे आणि न्यायदेवता आमच्या बाजूने निर्णय देणार आहे. त्यामुळे आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारने आम्हाला कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही शांत आहोत, असेच आम्ही शांततेत आंदोलन करत राहू.
रात्री न्यायालयाने एका विषयावरून गाड्या काढायला सांगितले होते. चार ते पाच तासांच्या आत आमच्या मुलांनी एकही गाडी रस्त्यावर ठेवली नाही. मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. यापेक्षा अधिक नियमपालन कसे करायचे? सरकारने आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन कितीही प्रयत्न केले तरी आम्ही फक्त नियम पाळून आंदोलन सुरू ठेवणार, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत बोलताना ते म्हणाले, “सगळ्या मागण्यांची हैदराबाद गॅझेटनुसार अंमलबजावणी झाली शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. कुणबी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, हे शिंदे समितीने स्पष्ट करावे. समितीला अधिकृत कार्यालय दिले जावे आणि जर मुदतवाढ देण्यात आली तर त्यांनी प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. बलिदान दिलेल्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांनी केवळ आमच्या मागण्यां मान्य कराव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे जरांगे म्हणाले.
