मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली. 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईत उपोषणाला बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. ते तिथे मला फक्त नेऊन सोडण्यासाठी आले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून आम्ही फार संयमाने घेत आहोत. सरकारने मागील उपोषण सोडताना आमच्या 4 मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली होती. पण आज 3 महिने झाले. अद्याप एकाही मागणीची अंमलबजावणी झाली नाही. मला माझ्या समाजाच्या लेकरांच्या अडचणी पहाव्या लागतात. त्यामुळे आम्ही संयम तरी किती दिवस पाळायचा. त्यामुळे आम्ही 29 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत गेल्याशिवाय यावर तोडगा निघणार नाही हे आता आमच्या लक्षात आले आहे.
आता मुंबईत आमरण उपोषण होणार. आम्हाला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीने उठाव करावा लागणार आहे. सर्व मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर आपापली कामे उरकून घ्यावीत. आता माघारी यायचे नाही. सगे सोयरेच्या अधिसूचनेला दीड वर्षे लोटले. पण अद्याप त्यावरही काही झाले नाही. पुढील 1 ऑगस्ट रोजी मी माझ्या आंदोलनाची पुढील दिशा सांगेन. या सरकारने 100 टक्के आपली फसवणूक केली यात शंका नाही.
सरकारला आता समजून घेण्याचे कोणतेही कारण नाही हे मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे आता मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतरच नाही. आंदोलनाची पुढील टप्प्याची रुपरेषा काय असेल ती आज मी सांगणार नाही. ती 1 ऑगस्टला सांगेन. तुम्ही सर्वांनी मला मुंबईला नेऊन सोडले तरी पुरेसे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही घणाघात केला. ते म्हणाले, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. त्याला कुणीही विरोध केला तरी ते आम्हाला द्या. त्याला रोखून धरू नका. मी आझाद मैदानावर किंवा मंत्रालयापुढे उपोषण करेन. उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. मी उपोषण केले की, माझा समाज रुसतो. त्यांनी रुसू नये. कडवट वागायचे, धाडस दाखवावे. शक्य आहे त्यांनीच मला सोडण्यासाठी मुंबईला यावे. मी तुमच्यासाठी लढण्यास खंबीर आहे. राज्यातील 7 कोटी मराठे माझ्या मागे आहेत.
सत्ता येते जाते. पण माणसाच्या डोक्यात एकदा खुन्नस बसली की, सत्ता गेल्यानंतर लोक बदला देतात. त्यामुळे फडणवीस यांनी खुनशीपणाने वागू नये. गर्वात राहू नये. इथली काँग्रेसची सत्ता गेली. तुमचीही जाईल. मराठा व कुणबी एकच आहेत याचा तातडीने अध्यादेश काढा. नोंदी सापडलेल्या लोकांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
