नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सध्या ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांची अचानकपणे प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दरम्यान त्यांच्या अचानकपणे पोट दुखत होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना त्रास होत असल्याचे समजताच डॉक्टरांनी तात्काळ त्यांची तपासणी केली आहे. नांदेडच्या शास्त्रीय विश्रामनगरात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगेसोयरे’ अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यासाठीच ते सध्या दौऱ्यावर असून आज त्यांनी नांदेड जिल्ह्यात बैठका घेतल्या. या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दंगल भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनादरम्यान, राज्यात जातीय दंगल पेटवण्याचा डाव असल्याची मला कुणकुण लागल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. तसेच आंदोलनादरम्यान एका पोराला जरी धक्का लागला, तर संपर्णू राज्य बंद पाडू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
