जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापौर दीपमाला काळे यांनी ठाण मांडून सर्वांची हजेरी घेतली.

“उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा वाजता (९:४५) कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा सज्जड इशारा त्यांनी आज दिला. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. “अधिकारी वेळेवर भेटत नाहीत, त्यामुळे आमची कामे रखडतात,” असा सूर जळगावकर व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज थेट मैदानात उतरून महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. आज सकाळी ९:५० ला महापालिकेत अचानक भेट दिल्यानंतर लक्षात आले कि, मनपा अधिकारी व कर्मचारी आपल्या सोईनुसार ड्यूटीवर येत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे कि, आता प्रशासक काळ संपला आहे व कर्तव्याची जाणीव ठेवून आपण या शहरातील नागरिकांच्या कराच्या रकमेतून पगार घेतो. त्यांचे आपण देणे लागतो. या भावनेने कर्तव्य पालन केले पाहिजे.
महापौरांचे महत्त्वाचे निर्देश
वेळेचे पालन: सर्वांनी सकाळी ९:४५ वाजेपर्यंत महापालिकेत हजर राहणे बंधनकारक आहे. शिस्तबद्ध हजेरी: वेळेवर हजेरी पत्रकावर सह्या करून प्रत्येकाने आपापल्या नेमून दिलेल्या विभागात कामावर रुजू व्हायचे आहे. दंडात्मक कारवाई: सकाळी १० वाजेनंतर कार्यालयात येणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. सेवेची बांधिलकी: “आपण नागरिकांना सेवा देण्यासाठी बांधील आहोत, त्यामुळे कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही,” असे महापौरांनी स्पष्ट केले.
अधिकारीही रडारवर
आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास महापौर स्वतः महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी लेटलातिफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, हजेरीबाबत कडक नियम लागू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हजेरीबाबतचे अधिकृत पत्र (आदेश) काढण्याचे निर्देश दिले आहेत.



