मुंबई : वृत्तसंस्था
मुलुंड (पश्चिम) परिसरातील एलबीएस रोडवर शनिवारी दुपारी 12.20 च्या सुमारास मेट्रो पुलाच्या स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात ऑटो व कारवर स्लॅब पडल्याने 3-4 जण जखमी झाले, तर एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मेट्रो पुलाचे काम सुरू असतानाही या ठिकाणी बॅरिकेट्स किंवा इतर योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, ज्यामुळे परिसरात मोठा धक्कादायक खळबळ उडाली. स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी आणि संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला आणि वाहतूक वळवली.
सध्या या घटनेमागील कारणांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत पाहिले जात आहे की, बांधकामाच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन केले गेले होते की नाही. मुलुंड येथील एलबीएस रोडवर अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे, ज्यात मोठ्या गर्डर व स्लॅब्स बसवण्याचे काम रोज चालू असते. मुंबई महापालिकेनेही या घटनेची पुष्टी करत, संपूर्ण परिसर ताब्यात घेतल्याचे आणि आवश्यक ती मदत व तपास सुरू असल्याचे जाहीर केले आहे.



