जळगाव : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर) सराईत चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, भुसावळ व गुजरातमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ न्यायालय परिसरातून एक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व उद्धव डमाळे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. गोपनीय माहितीच्या आधारे किरण ऊर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर) याला चोरीच्या मोटारसायकलसह अटक करण्यात आली.
सखोल चौकशीत आरोपीने सुरत (गुजरात) येथील चलथान पोलिस स्टेशन हद्दीतील होंडा शाइन (क्र. जीजे ०५-एनए ६१८०) चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. तपासात आरोपीविरुद्ध मलकापूर व भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.



