मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याचे निर्देश कायम ठेवल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या व्यक्तींच्या मुजोरपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
संदीप देशपांडे यांच्या या टी-शर्टवर, ‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’, असा मजकूर लिहला आहे. हे दादर परिसरात हा टी-शर्ट परिधान करुन फिरत होते. हा टी-शर्ट त्यांनी मुंबईत राहून मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याच निर्देश दिल्यांनतरही महेंद्र संकलेचा या व्यक्तीने आपली कार दादर कबुतरखान्याच्या परिसरात नेऊन एक ट्रे गाडीच्या छतावर ठेवला होता. जेणेकरुन कबुतरांना खाणे मिळेल. आम्ही अशा आणखी 12 गाड्या आणणार आहोत.
न्यायालयाने कबुतरखान्यात दाणे टाकायला मनाई केली आहे. मी गाडीच्या टपावर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालत आहे, अशी माजोरडेपणाची भाषा महेंद्र संकलेचा याने केली होती. यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर दादर कबूतरखाना ट्रस्टकडून परिसरात जागोजागी फलक लावून कबुतरांना कोणीही धान्य घालू नये. कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा हातात घेतलेल्या मनसेच्या नेत्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोहिम प्रतिष्ठेची ठरली. मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खास टी-शर्ट परिधान केले होते. यावर आवाज मराठीचा, असे लिहिले आहे. तसेच मराठीतील बाराखडीची अक्षरदेखील टी-शर्टवर पाहायला मिळाली होती.
