नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत सखोल आणि जलद चौकशीची मागणी केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरणाद्वारे अपघातासंदर्भातील विविध मुद्दे उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले की, अपघाताच्या काही क्षणांपूर्वी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामध्ये त्या “ओह शीट… ओह शीट” असे म्हणताना ऐकू येते. विमान अत्यंत खाली आल्याची जाणीव झाल्यानेच ही प्रतिक्रिया असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, कॅप्टन पाठक यांच्या कार्यपद्धतीवर कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट करत संशय मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेबाबत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघात ज्या गावाजवळ झाला, त्या परिसरातून नियमितपणे विमाने उड्डाण करत असतात. तथापि, ग्रामस्थांनी संबंधित विमानाचा आवाज वेगळा असल्याचे सांगितल्याचा दावा पवार यांनी केला. विमान अतिशय खाली आल्यास स्टॉल वॉर्निंग सिस्टीम कार्यान्वित होणे अपेक्षित होते; मात्र ती प्रणाली बंद असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच, मूळ नियोजित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्याने ऐनवेळी सुमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. कपूर यांचा परवाना २०१० आणि २०१७ मध्ये मद्यप्राशन करून विमान चालवल्याप्रकरणी निलंबित किंवा रद्द करण्यात आल्याचा उल्लेख करत, त्यांच्या लँडिंग कौशल्याबाबतही पूर्वी तक्रारी झाल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व बाबींचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास व्हावा, तसेच अपघातामागील खरी कारणे लवकरात लवकर समोर यावीत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून अपघाताचा तपास सुरू असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.


