Home » राष्ट्रीय » भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जिल्ह्याची भरीव प्रगती

जळगाव दि. 15 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – “शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात भरीव प्रगती झाली आहे. ही गती कायम ठेवत पुढील काही वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी शासन व प्रशासन एकत्रितपणे प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजरोहण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी भाषणात सांगितले की, अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 2 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 2024-25 मध्ये 53 कोटी 95 लाख रुपयांची विमा भरपाई थेट त्यांच्या खात्यात जमा झाली. हवामान आधारित फळपिक विमा, ठिबक-तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण व अन्न प्रक्रिया या क्षेत्रांत जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. वाघूर व हतनूरसह लघु-मध्यम प्रकल्पांतून शेतीला पाणीपुरवठा होत असून, भागपूर व पाडळसरे उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचित करण्याचे काम सुरू आहे. ‘हर खेत को पानी’ योजना, आधुनिक पाइपलाइन व सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर वाढला आहे. पीएम-कुसुम व ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत आतापर्यंत 17,163 सौर पंप बसवले गेले आहेत, ज्यामुळे दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा मिळत आहे.

महिला सक्षमीकरणाबाबत त्यांनी सांगितले की, जळगावमध्ये अत्याधुनिक महिला व बाल विकास भवन उभारले गेले असून ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू झाले आहे, जे पीडित महिलांना तातडीची मदत, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि आश्रय पुरवत आहे. राज्यातील पहिली ‘बहिणाबाई मार्ट’ संकल्पना जळगावमध्ये यशस्वी झाली असून जिल्ह्यात 11 मार्ट सुरू आहेत. गेल्या वर्षी 31 हजार महिला बचत गटांना 430 कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले, तर यंदाचे 1 हजार कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यापैकी 200 कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. 2025-26 पासून “आदिशक्ती अभियान” राबवून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर ‘आदिशक्ती पुरस्कार’ देण्यात येतील, ज्यांची रक्कम 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल व ती महिला व बालविकासासाठी वापरली जाईल.

आरोग्य क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करताना पालकमंत्री म्हणाले की, सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थ्रीटी, सीटी स्कॅन, आयसीयू, जळीत कक्ष, ईएसडब्ल्यूएल सेंटर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा मागील दोन वर्षांत 57 कोटींच्या निधीतून उपलब्ध झाल्या आहेत. हजारो गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया होत असून चिंचोली येथे सर्व प्रकारचे उपचार एका ठिकाणी उपलब्ध होणारे अत्याधुनिक मेडिकल हब उभारले जात आहे.

पायाभूत सुविधा व वाहतूक क्षेत्रातील सुधारणा सांगताना त्यांनी पाळधी-तरसोद 17 किमी बायपास मार्ग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. पाळधीपर्यंतचा रस्ता दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून जिल्ह्यात नवीन 89 बसेस, चोपडा बस आगारासाठी 5 ई-बसेस व जळगाव डेपोसाठी 8 ई-बसेस मिळाल्या आहेत. पुढील काळात 171 ई-बसेस उपलब्ध होऊन प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा होईल.

घरकुल योजनांबाबत पालकमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास, पारधी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनांमधून 2,80,000 घरांच्या उद्दिष्टापैकी 2,75,000 घरांना मान्यता मिळाली असून त्यापैकी 1,22,000 कुटुंबांना पक्के घर मिळाले आहे.

ग्रामविकास, पर्यावरण व पर्यटन क्षेत्रात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत गावागावात विकासाची स्पर्धा निर्माण झाली आहे. स्त्री नेतृत्व वाढवण्यासाठी “बालिका पंचायत” सुरू झाली आहे. “मिशन संजीवनी” अंतर्गत पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य करण्यात आले असून सातपुडा पाल जंगल सफारीमुळे जैवविविधतेचे संवर्धन, रोजगारनिर्मिती व पर्यटन वाढीस चालना मिळत आहे.

सुरक्षा व नागरी सुविधांच्या बळकटीसाठी रामानंद पोलीस स्टेशनची नवी इमारत, पोलीस चौक्यांची बांधकामे व दुरुस्ती, 16 जीप्स, मोटारसायकली व चारचाकी वाहने जिल्ह्यात उपलब्ध झाली आहेत. जळगाव महानगरपालिकेत पाणीपुरवठा सुधारणा, मलनिस्सारण योजना सुरू असून, 50 बॅटरी बसेस मंजूर झाल्या आहेत. नगरोत्थान व दलितवस्ती रस्ते सुधारण्यासाठी 110 कोटींपेक्षा अधिक निधी दिला आहे.

प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे. अखेरीस पालकमंत्र्यांनी जळगावची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा संकल्प व्यक्त करत सर्व जिल्हावासियांना विकासयज्ञ पुढे नेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, नागरिक, माध्यम प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *