Home » महाराष्ट्र » ‘एकच राष्ट्रवादी, पण स्वतंत्र!’ : प्रफुल पटेल यांची स्पष्ट भूमिका

‘एकच राष्ट्रवादी, पण स्वतंत्र!’ : प्रफुल पटेल यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत महत्त्वाची घोषणा केली. येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही आमची जबाबदारी असल्याचे पटेल यांनी नमूद केले. “अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. संघटनात्मक आणि विधिमंडळ नेतृत्वाची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून ती आम्ही पूर्ण करत आहोत,” असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य निवडीला पक्षाच्या नव्या टप्प्याची सुरुवात मानले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुढे स्वतंत्र राजकीय भूमिका अधिक ठळकपणे मांडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच जबाबदार धरले. “या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वाधिक आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय (CBI) चौकशीत स्पष्ट होईल. मात्र सकृतदर्शनी कंपनी मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रोहित पवार यांनी अपघातापूर्वी एका पूर्व विदर्भातील नेत्याचा अजित पवारांना फोन आल्याचा आरोप केला होता. तसेच “पायलटने मुद्दाम विमान खाली पाडले” असा खळबळजनक दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना पटेल यांनी संयत भूमिका घेतली. “मी जबाबदार व्यक्ती आहे. तथ्यांशिवाय आरोप-प्रत्यारोप करणे मला योग्य वाटत नाही,” असे सांगत त्यांनी थेट भाष्य टाळले. फोनप्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना पटेल म्हणाले, “अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी त्यांना फोन केला होता, मात्र तो शेतकऱ्यांच्या विषयासाठी होता. कुठल्याही खासगी फाईलसाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी नव्हता. त्या दिवशी त्यांना अनेकांचे फोन आले असतील. मी दिल्लीत होतो आणि त्यांनी कुठे प्रवास केला आहे, याची मला माहिती नव्हती.”

विलीनीकरणाच्या चर्चांना दिलेला स्पष्ट नकार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळक करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी विमान अपघातावरील विधानांमुळे प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात पक्षांतर्गत घडामोडी आणि चौकशी अहवाल यानुसार राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *