सोलापूर : वृत्तसंस्था
शहरातील कलावती नगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मृतांची नावे सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोघांनी आपल्या दोन मुलींसह जेवण करून झोप घेतली होती. शुक्रवारी सकाळी मात्र आई-वडील झोपेतून उठत नसल्याचे लक्षात आल्याने मुलींनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोघांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या मुलींनी तत्काळ काकांना फोन करून माहिती दिली.
नातेवाईकांनी दोघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. विषप्राशनाची शक्यता नाकारता येत नसली तरी घातपाताचा कोनही पोलिस तपासत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.



