Home » राष्ट्रीय » पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !

पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचसोबत पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पवार कुटुंबीयांनी एकत्र यावे असे आवाहन केले होते. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लहानपणापासून एकत्र आहेत. आऊ साहेब आणि बाळासाहेब ठाकरे राजावर सर्वात जास्त प्रेम करत होते. राजा म्हणजे राज ठाकरे. पण राजकारणामुळे थोडी दरी झाली. सर्व घराण्यांनी एकत्र यावे. पवार कुटुंब पण एकत्र यायला पाहिजे. तसे झाले तर मला त्याचा आनंदच होईल. दरम्यान, अजित पवार यांनी सभेत बोलताना मी अडीच वर्षांनी नव्या लोकांना मंत्रिपद देण्याचे सांगितले होते. मी माझा शब्द पूर्ण करणार, असे विधान केले होते. त्यामुळे आता कोणाला मंत्रिपद दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यात छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. आता त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यावर छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, मी काय करू, अजित पवार यांनी ते विधान केले आहे, तर ते बघटिल. याबाबत त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवारांच्या गटात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात भेट व चर्चा देखील झाली होती. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियात आहे. 1990 पासून ते प्रबळपणे काम करतात. त्यांच्या मनातील फारसे कोणाला कधी कळले नाही. विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती, दीर्घकाळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *