Home » जळगाव » चाळीसगाव » पोलिस उपनिरीक्षकांच्या घरावर पेट्रोल ओतून आग; सीसीटीव्हीत दोन संशयित कैद !

पोलिस उपनिरीक्षकांच्या घरावर पेट्रोल ओतून आग; सीसीटीव्हीत दोन संशयित कैद !

चाळीसगाव : प्रतिनिधी

नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत रात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून जाळपोळी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते. लोखंडी गेट ओलांडून ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचले आणि बिलसरीतून पेट्रोल ओतून आग लावली. दरवाज्याजवळील परद्याने तात्काळ पेट घेतल्याने धूर घरात पसरला, परंतु घरातील सदस्यांनी धाडस दाखवून आग विझवली. घटनास्थळी आढळलेल्या रिकाम्या पेट्रोलच्या बाटल्या, माचिस पेटी आणि जळालेल्या आगकाडीमुळे हा प्रकार जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री २.५८ वाजता दुचाकीवरील दोन व्यक्ती स्पष्ट दिसून आले आहेत. हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.

या घटनेवर पाचोरा पोलिस ठाण्यात जाळपोळ करण्याचा प्रयत्न, जीवितास धोका आणि सार्वजनिक शांततेला बाधा अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा केला असून, पोलीस तपास सुरू आहेत. नगरदेवळा परिसरात ही घटना मोठा धक्का देणारी ठरली असून पोलिस अधिकाऱ्यांच्या घरावर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर मानला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *