जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप पोलिस निरीक्षकावर करण्यात आला असून या प्रकरणात त्याला जळगावातील दोन भावंडांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या आरोपानंतरही तीन दिवस उलटले असताना संबंधित दोघांविरोधात कोणतीही ठोस चौकशी न झाल्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
बैठकीत आमदार चव्हाण यांनी दोघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासण्याची मागणी केली होती. शिवाय, त्यांच्याकडे शस्त्र परवाने असून त्यांचा नेमका व्यवसाय काय आहे, की ज्यामुळे शस्त्राची आवश्यकता भासते, असा प्रश्नही उपस्थित केला होता. या गंभीर मुद्द्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. घटनेनंतर पहिल्या दिवशी संबंधित दोघांचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. त्यानंतर चौकशीचा विषयच थंडबस्तात गेला असून, शस्त्र परवाना कोणत्या आधारावर देण्यात आला, याचीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आमदारांनी आरोप केल्यानंतर महिलेने पुढे येऊन अधिकृत तक्रार देण्यास नकार दिला, हे कारण पुढे करत पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणात ‘त्या’ दोघांकडून दबाव टाकण्यात आला का? त्यांना आणि संबंधित पोलिस निरीक्षकाला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले का? अशा चर्चा सध्या समाजमाध्यमांत आणि स्थानिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहेत. या सर्व मुद्द्यांवर प्रशासन आणि पोलिस दलाकडून स्पष्टता मिळणे गरजेचे आहे. अन्यथा, यामागे राजकीय किंवा आर्थिक दबाव असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
