जळगाव : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतुक उपसा करुन त्याची वाहतुक करणाऱ्यांविरोधात पोलीस दलाकडून नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये भल्या पहाटे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. परंतू कारवाई साठी पथक नदीपात्रात पोहचले खरे, मात्र त्यांना नदीपात्रात एकही वाहन मिळून आले नाही. तसेच पोलिसांनी गावांमध्ये वाळू उपसा करणारे ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर व ट्रक जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी पहाटे पाच वाजता करण्यात आली. कारवाईमध्ये जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आले आहेत. या वाहनांमध्ये मात्र वाळू आढळून आलेली नाही.

शहरालगत असलेल्या गिरणा नदीपात्रातून दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा केला जातो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती घेण्यात आली. शुक्रवारी पहाटे पाच वाजताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह जळगाव उपविभागातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी तसेच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकासह आरसीपीच्या दोन प्लाटून, क्यूआरटी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखेचे प्रभारी व त्यांचे सहकारी असा मोठा ताफा नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये शिरला पोलिसांचा ताफा हा गिरणानदीपात्रालगत असलेल्या बांभोरी, टाकरखेडा, खेडी यासह इतर गावांमध्ये शिरले. त्यांनी गावाला वेढा टाकत सर्च ऑपरेशन राबविले. पोलिसांनी बांभोरीसह इतर गावे पिंजून काढत ज्या घरांच्या बाहेर विना क्रमांकाचे डंपर, ट्रॅक्टर, ट्रक उभे आहेत ती सर्व वाहने ताब्यात घेत ती पोलीस मुख्यालयात आणली.
पहाटेच्या अंधारात पोलिसांचा ताफा हा गावांमधील गल्लीबोळातून फिरत होते. ज्या घरासमोर किंवा मोकळ्या जागेत ट्रॅक्टर, ट्रक, डंपर दिसले त्याची चौकशी करुन ते ताब्यात घेण्यात आले. वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी ज्या वाहनांवर वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहे, अशा वाहनांचा शोध घेण्यात आला. तसेच ज्या वाहनांमधून वाळू वाहतूक होण्याची शंका आहे, अशा वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.



