जळगाव : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याच्याकडून लाखांमध्ये रक्कम घेण्याचा प्रकार घडल्याने पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले असल्याचे बोलले जात आहे. याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आठवडाभरापूर्वी एक बंगाली सुवर्ण व्यवसायिक सोने व काही रक्कम सोबत घेऊन जात असताना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडे चौकात त्याला अडवून शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याच्याकडे असलेली रक्कम या दोघांनी घेतली. यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर काही जणांच्या मध्यस्थीने ही रक्कम संबंधित व्यापाऱ्यास परत मिळाली.
हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही हा विषय पोहोचला. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याची विचारणा करण्यात आली. यात त्याची रक्कम परत मिळाल्याने त्याचे काहीही म्हणणे नव्हते. मात्र हा गंभीर प्रकार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची पोलिस ठाण्यातून उचलबांगडी अटळ असल्याचे मानले जात आहे.



