जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वीच आलेल्या सोहम गोपाल ठाकरे (वय २०) याला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बरॅकच्या दरवाजावर आदळत मारहाण केली. ही घटना २७सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील सोहम ठाकरे याला २० सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहातील बरॅक क्रमांक १३मध्ये तीन क्रमांकाच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले. २७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपलेला असताना तेथे कुणाल चौधरी हा आला व पायाने धक्का देत उठविले व बाहेर ये, मला तुझ्याशी काम असल्याचे सांगू लागला. सोहम उठताच त्याला मारहाण सुरू केली. तसेच अजय मोरे याने पकडून ठेवले व कुणालने बरॅकवर डोके आपटून सोहमला दुखापत केली. त्यामुळे त्याच्या कपाळ, नाकातून रक्त येऊ लागले. त्या वेळी इतरांनी तरुणाची सुटका केली.
