Home » राष्ट्रीय » २ मार्चला मुंबईत आंदोलन; केंद्र सरकारविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

२ मार्चला मुंबईत आंदोलन; केंद्र सरकारविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नागपूर : वृत्तसंस्था

भारत-अमेरिका करारामुळे देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष असलेल्या आंबेडकर यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारवर निशाणा साधत, हा करार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचा दावा केला. या करारामुळे यापुढे अमेरिकेचा भारताच्या आर्थिक धोरणांवर प्रभाव राहील आणि उद्योग व आर्थिक निर्णयांवर देखरेख ठेवली जाईल, अशी टीका त्यांनी केली.

निर्यात शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, यापूर्वी अमेरिकेकडे सुमारे अडीच टक्के निर्यात शुल्क आकारले जात होते; मात्र आता ते १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. उलट आयात वस्तूंवर शून्य टक्के शुल्क ठेवले जाणार असल्याचे सांगत त्यांनी या धोरणामुळे देशांतर्गत उद्योगांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली.कृषीविषयक प्रश्नांपलीकडे इतर महत्त्वाच्या आर्थिक विषयांवर विरोधकांनीही भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, तथाकथित ‘एपस्टीन फाइल’ प्रकरणावरूनही आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विदेशात नाव आलेल्या व्यक्तींवर कारवाई होत असताना भारतातील तिघांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी २ मार्च रोजी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध असताना भारताने ती खरेदी का थांबवली, याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. अमेरिकेच्या दबावामुळे इतर देशांकडून तेल खरेदी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.भविष्यात इराणसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अमेरिका भारताच्या भौगोलिक स्थानाचा लष्करी कारणांसाठी वापर करू शकते, अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी भारताच्या परराष्ट्र स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत आंबेडकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *