मुंबई : वृत्तसंस्था
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून संघटनेत अनेक बदल करीत असतांना आता मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर पाऊल उचलत खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. या निर्णयाने कोकणातील मनसेच्या राजकीय रणनीतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
मनसेने वैभव खेडेकर आणि इतर तीन नेत्यांना पक्षातून बडतर्फ करताना पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियम व धोरणांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मनसेकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलं आहे, “पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.” खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि दापोलीतील महायुतीच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तातडीने हा निर्णय घेतला.
भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाच्या चर्चांनी गेल्या काही महिन्यांपासून कोकणातील राजकारण ढवळून निघालं होतं. दापोलीतील एका महायुतीच्या कार्यक्रमात खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते, आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांना पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती. “आम्ही एका कुटुंबातील माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकरांना माहित आहे,” असं कदम यांनी सूचकपणे म्हटलं होतं. खेडेकर यांनी या चर्चांना दुजोरा दिला नसला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी गणेशोत्सवानंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, खेडेकर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर “निष्ठवंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते” असा खोचक संदेश टाकला, यानंतर पक्षप्रवेशाचा चर्चांना बळ मिळालं. यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आणि काही नेते राज ठाकरेंना चुकीची माहिती देत असल्याचं सांगितलं. तथापि, त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांच्या या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी कठोर पाऊल उचलत त्यांची हकालपट्टी केली.
