Home » राष्ट्रीय » राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान !

राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकरी मेळाव्यात राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील, अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. शेट्टी म्हणाले, जर कारवाई करणारच असाल आणि काटा मारणारे शोधून काढलेच असतील, तर ती यादी लोकांसमोर तात्काळ जाहीर करा. शब्द नव्हे, कृती दाखवा.

शेट्टी यांनी सरकारच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी फडणवीसांवर आणि भाजपवर थेट निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले, काटा मारणारे आणि रिकव्हरी चोरणारे तुम्हीच सोबत घेऊन फिरता. तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केलं, त्या तुमच्या पक्षातील पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यातही काटामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक नाही. शेट्टींच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापलं आहे. त्यांनी पुढे लिहिलं, तरीही जर काटा मारणारे शोधूनच काढले असतील, तर तुमचं जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा; पण ती यादी लवकर जाहीर करा.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्यात साखर कारखानदारांवर टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, हे कारखाने मालकांचे नाहीत, शेतकऱ्यांचे आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे. काटामारीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आणि त्याच वेळी कारखानदार नफ्यात राहतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच, शेतकऱ्यांच्या नफ्यातून थोडा हिस्सा त्यांच्या मदतीसाठी द्यायला कोणी तयार नाही, हे अन्यायकारक आहे, असंही फडणवीसांनी म्हटले होते.

राजू शेट्टी यांची पोस्ट देखील पहा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात तुम्हीच काय तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केला त्या तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरूष समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यात देखील काटामारी करणाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची धमक नाही …!तरीही काटा मारणारे शोधूनच काढला आहात तर तुमच जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *