जळगाव : प्रतिनिधी
जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केल्याप्रकरणी मनोज लीलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी) यास अटक करण्यात आले. त्यास न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक करण्यात आली होती. खरेदी होत नसल्याने रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार दि. १५ मे २०२३ ते दि. ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना मनोज वाणी यास अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी दिली.



