भडगाव : प्रतिनिधी
शहराजवळील घोडदे भागात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पथकास आढळले होते. हे ट्रॅक्टर कारवाईसाठी ताब्यात घेतले असता तलाठ्यांच्या डोळे व चेहऱ्यावर वाळू फेकत १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अन्य वाळू माफिया फरार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भडगावचे मंडळ अधिकारी कुणाल सुकदेव कोळी, ग्राम महसुल अधिकारी मेहमुद जब्बार खाटीक, टोणगावचे २ ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, वाकचे ग्राम महसूल सेवक विशाल सूर्यवंशी यांचे पथक २३ रोजी मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूकविरोधात कारवाईसाठी खासगी वाहनाने रवाना झाले होते. जुन्या पिंपळगांव रस्त्यावरील घोडदे भागात नदी पात्राजवळ गस्त घालताना गिरणा नदीतून एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली व त्याच्या पाठीमागे एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळी. त्यात सुमार प्रत्येकी एक ब्रास वाळू होती. पथक प्रमुखांनी दोन्ही ट्रॅक्टर थांबवून चालकांना परवाना मागितला. त्यांच्याजवळ परवाना नव्हता.
त्यामुळे बेकायदेशीर वाळू वाहणारे हे दोन्ही ट्रॅक्टर कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत होते. दरम्यान, घोडदे दग्र्याजवळ १० ते १२ वाळू माफियांनी ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे यांच्या चेहऱ्यावर वाळू फेकली तर ग्राम महसुल सेवक विशाल सूर्यवंशी यांना ट्रॅक्टरवरुन खाली ओढले. तसेच पथकातील कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की व शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला ढकलून दिले. ग्राम महसूल अधिकारी मेहमुद खाटीक यांना मारहाण केली. त्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. तर मदतीला येणारे पोलीस पाहून गोळा झालेले लोक पळून गेले.
त्यातील एक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आ-हे. या बाबत मंडळ अधिकारी कुणाल कोळी यांच्या फिर्यादीवरून शहरातील यशवंत नगरमधील पंडीत पाटील यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचोरा तालुक्यातील पुणगाव येथील सोनु सुरवाडे पळून गेला आहे. तपास पो.नि. पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. गणेश मस्के करत आहेत. संशयित पंडीत पाटील यांस न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
