भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सिंगारबर्डी (ता. भुसावळ) येथील लक्ष्मण वसंत ठाकरे (वय सुमारे २५-३०) हा युवक वाघूर नदीत वाहून गेला. शोधकार्य रात्रीपर्यंत सुरुच होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लक्ष्मण ठाकरे म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेला होता. काही वेळाने म्हशी गावाच्या दिशेने सैरावैरा पळत आल्याने ठाकरे नदीत उतरून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने तो पाण्याच्या लाटांमध्ये वाहून गेला. ही घटना त्याचा चुलतभाऊ योगेश भगवान ठाकरे याने पाहिल्यानंतर गावकऱ्यांना कळविले. तर वाघूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने नदीची पाणी पातळी वाढली होती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे हे झोपडीत राहत होते. उदरनिर्वाह कुटुंबाचा करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पश्चात दोन भाऊ व बहीण आहे. महसूल प्रशासन दुपारी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यत गावकऱ्यांनीच शोधकार्य सुरू ठेवले होते. ठाकरे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. माहिती मिळताच पोलिस पाटील गणेश भोई, प्रवीण पवार, दीपक चराटे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले होते.
