जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील आवार येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह चोपडा तालुक्यातील वाळकी गावातील तापी नदीच्या पांथ्यावर आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, हा तरुण मतिमंद असून शौचाला गेल्यानंतर नदीत पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाळकी येथील तापी नदी पांथ्यावर ८ जुलैला एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांना आढळले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी यांनी ग्रामस्थांकडून याबाबत माहिती घेऊन पोलीस पाटलांना या घटनेबाबत पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले होते. यानंतर पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, मयत तरुणाचा फोटो सोशल मीडियाच्या ग्रुपद्वारे व्हायरल झाला. त्याची या तरुणाच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहचल्याने ओळख पटवण्यात यश आले. तर मयत तरुण हा जळगाव तालुक्यातील आवार येथील पवना कैलास सोनवणे (मांग, वय २३) असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पवन हा मतिमंद असून हा तरुण ४ जुलैला सकाळी ६ वाजता घरातून शौचासाठी बाहेर पडला होता. परंतु, तो परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतल्यानंतरही तो कोठेच आढळून आला नव्हता. दरम्यान, या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, मयत पवन सोनवणे यांच्या अंगावरील टी-शर्ट, पॅन्ट, बेल्ट व अंगावरील इतर वर्णनावरून त्याची ओळख पटली आहे. पोलिसांनी खातरजमा करून त्याची आई व भाऊबंदकीतील लोकांकडे पवनाचा मृतदेह सोपवल्यानंतर त्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत, असे समजते. दरम्यान, याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.नि. अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ. सुनील कोळी, हेमंत कोळी, रवींद्र पाटील, विठ्ठल पाटील करत आहेत.
