Home » राष्ट्रीय » शरद पवार यांची तब्येत खालावली; राज्यातील राजकारणात खळबळ !

शरद पवार यांची तब्येत खालावली; राज्यातील राजकारणात खळबळ !

बारामती  : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती काहीशी ढासळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहात होते. आज बारामती येथे पार पडणाऱ्या अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. घरी विश्रांती घेऊनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना पुण्यात नेण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. कार्डियाक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका त्यांच्या ताफ्यात असून, प्रवासादरम्यान वैद्यकीय पथकही सोबत असणार आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर डॉ. सिमोन ग्रँड यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयाचे सल्लागार अली दारुवाला यांनी ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्या प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारपद्धती ठरवली जाणार असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समजताच पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलले असतानाच शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *