जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या किशोर अशोक पाटील (वय २३, रा. टाकरखेडा, ता. एरंडोल) या युवकाने टाकरखेडा शिवारातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, किशोर पाटील गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान टाकरखेडा गावाच्या शिवारात एका विहिरीजवळ त्याचा मोबाईल आढळून आला. विहिरीत पाहिले असता रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास किशोरचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मित्रांशी तसेच आई-वडिलांशीही फोनवर बोलणे केल्याचे समोर आले आहे. मात्र, या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत



