Home » जळगाव » धक्कादायक : उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक !

धक्कादायक : उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र, लेटर पॅड, बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासह म्हाडामध्ये फ्लॅट देणे व इतर वेगवेगळे आमिष दाखवून दाम्पत्याने नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही फसवणूक केली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात मूळचे पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (४९) व पत्नी अर्पिता संघवी (४५, दोघे रा. ह.मु, नवी मुंबई) या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

हितेश रमेश संघवी व अर्पिता संघवी यांनी नोकरी लावून देण्यासह वेगवेगळे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. संशयित दाम्पत्याने २३ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हर्षल शालिग्राम बारी (३२, रा. विठ्ठल पेठ) यांची १३ लाख ३८ हजार रुपये व इतर उर्वरित जणांकडून एकूण ४२ लाख २२ हजार रुपये अशी एकूण ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. हर्षल बारी यांचा दूध डेअरीचा व्यवसाय असून कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या डेअरीमध्ये हा सर्व प्रकार घडला. अनेक दिवस झाले तरी ना नोकरी मिळाली किंवा कोणतेही काम मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *