मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसाद हा लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. मात्र, प्रसादाच्या लाडवात अळ्या आणि बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने ही धक्कादायक घटना मोबाईल कॅमेऱ्यात टिपून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
या घटनेने मंदिर समितीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारावर पुन्हा प्रकाशझोत पडला आहे. सध्या मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे, तर कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने संपूर्ण जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. यामुळे कामकाजात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप भाविक करत आहेत. विठुरायाच्या प्रसादासारख्या पवित्र बाबतीत दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर खडबडून जागे झालेल्या मंदिर समितीने लाडवात अळी आणि बुरशी आढळल्याचे मान्य केले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित कामगारांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रभारी व्यवस्थापकांनी दिले आहेत.या घटनेमुळे मंदिर समितीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असून, भाविकांमध्ये विश्वास टिकवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
