यावल : प्रतिनिधी
फैजपूर रस्त्यावरील पांडुरंग सराफनगरात शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तेव्हा पोलिसांनी जाऊन पाहिले असता घरात पशुवैद्यकीय अधिकारी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. दरम्यान ते शनिवारपासून घराच्या बाहेर न आल्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराने शनिवारी मध्यरात्रीनंतर झाला असावा असा अंदाज आहे. ते शहरात एकटेच राहत होते. पोलिसांनी तातडीने त्यांच्या भावाला माहिती दिली व रात्री उशिरा त्यांच्यावर शहरातचं अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भाग आहे. या विस्तारित भागात पांडुरंग सराफ नगर आहे. या पांडुरंग सराफ नगरात आत्माराम रामसिंग पाटील यांच्या घरात यावल शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८) हे राहत होते. दरम्यान त्यांच्या घरातून गुरुवारी दुर्गंधी येत असल्याची तक्रार लुकमान पटेल यांनी पोलिसांकडे केली.
तेव्हा घटनास्थळी पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, वसीम तडवी, राजेंद्र पवार पथकासह दाखल झाले. त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता घरात कुजलेल्या अवस्थेत भगुरे यांचा मृतदेह दिसून आला. तात्काळ फॉरेन्सीक पथक बोलावण्यात आले. ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अमोल अडकमोल, भूषण गाजरे यांच्या मदतीने मृतदेह तेथून काढला आणि रुग्णालयात आणण्यात आला. यावल पोलिसांनी आत्माराम पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.
