Home » महाराष्ट्र » पत्रकारांच्या सवालांनी सोमय्यांचा पारा चढला

पत्रकारांच्या सवालांनी सोमय्यांचा पारा चढला

नाशिक : वृत्तसंस्था

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या कथित बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्यावरून नाशिक येथे पत्रकारांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. “भाजप नेत्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ते फक्त स्वतःचे कथानक पुढे रेटण्यात व्यस्त आहेत,” असा आरोप विरोधकांनी केला.

सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना कथितपणे बनावट जन्मदाखले दिल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यभर मोहिम उघडली आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मालेगाव येथे ३,९७७ जन्मनोंदी रद्दबातल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन २०१६ नंतर ऑनलाईन पद्धतीने जारी करण्यात आलेल्या सुमारे १८ हजार जन्मदाखल्यांवर संशय व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना वातावरण चांगलेच तापले.

सोमय्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित नोंदींबाबत माहिती देत असताना एका पत्रकाराने, “ही माहिती राज्याच्या गृह विभागाकडे नाही का?” असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावरून सोमय्या संतप्त झाले. राज्यात गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, केंद्रात हे खाते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्याने वाद अधिकच वाढला. सोमय्यांनी पत्रकारांवर ठरवून प्रश्न विचारल्याचा आरोप केला, तर पत्रकारांनीही प्रतिप्रश्नांची सरबत्ती केली. “देशात भाजपचे सरकार असताना बांगलादेशी घुसखोर कसे घुसतात?”, “मालेगावात एकही बांगलादेशी सापडला नाही, मग कारवाई कशावरून?” अशा प्रश्नांवरून वातावरण तणावपूर्ण झाले. या घटनेनंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमय्यांवर निशाणा साधला. “प्रश्न विचारले की चिडणे ही लोकशाहीस अपमानकारक बाब आहे,” असा आरोप त्यांनी केला. भाजपकडून राज्यात भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही करण्यात आली. बांगलादेशी नागरिक आणि बनावट कागदपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी आणि तपास अहवाल समोर आल्यानंतरच या वादावर पडदा पडणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *