Home » जळगाव » एस.टी.बस नाल्यात पलटी; एक ठार तर अनेक जखमी !

एस.टी.बस नाल्यात पलटी; एक ठार तर अनेक जखमी !

एरंडोल : प्रतिनिधी


एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. एरंडोल-भडगाव मार्गावर धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MH २० BL ३४०२) एस.टी. बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, ३५ हून अधिक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. यानंतर प्रशासनाची यंत्रणा सक्रिय झाली. बसला नाल्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका व एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी प्रवाशांना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. एरंडोल येथेच किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असून, आरोग्य विभागाने सर्व आवश्यक वैद्यकीय व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासातून बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *