Home » राष्ट्रीय » अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू !

अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आयोजित रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या रॅलीला अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय थलापती उपस्थित राहणार होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रॅलीच्या ठिकाणी सुमारे ३०,००० लोकांची गर्दी झाली होती. विजय यांच्या भाषणासाठी राज्यातील विविध भागांतून समर्थक आले होते. मात्र, त्यांच्या आगमनाला सहा तासांचा विलंब झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. अचानक स्टेजकडे झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाली. या घटनेत महिलांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर करूर आणि तिरुची येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर आपत्कालीन मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून, अतिरिक्त पोलिस दल घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. टीव्हीकेच्या रॅलीमुळे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे पोलिसांनी अशा कार्यक्रमांसाठी काही अटी घालून दिल्या होत्या. मात्र, त्या अटींचे पालन झाले नसल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेनंतर आयोजकांनी घेतलेल्या परवानग्या, सुरक्षा उपाययोजना आणि पोलिस बंदोबस्त यासंबंधी तपास सुरू असून, याप्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *