जळगाव : प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील (१८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी मुलगा खाली न आल्याने त्याची आई वरच्या मजल्यावर त्याला बघण्यासाठी गेली असता, तिला मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडत आक्रोश केला. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी नातेवाईकांसह मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ऋषिकेश हा आई, वडील, आजी व मोठ्या भावासोबत वास्तव्यास होता. त्याने विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये ऋषिकेश याला ४९ टक्के गुण मिळाले. यावेळी त्याला परीक्षेत मिळालेले गुण अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने तो नाराज झाला. त्यानंतर तो घराच्या वरच्या मजल्यावर निघून गेला. त्याठिकाणी ऋषिकेशने चादरीच्या सहाय्याने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याच्या आईने हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
ग्रामस्थांच्या मदतीने ऋषिकेशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मयत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केल्यामुळे उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले होते. ऋषिकेशचे वडील हे शेती व सरवंती चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर त्याचा मोठा भाऊ गौरव ऊर्फ राम हा फार्मसीचे शिक्षण घेत आहे. ऋषिकेशने अकरावीपर्यंतचे शिक्षण जळगावात घेतले. त्यानंतर तो धुळे येथे आत्याकडे शिक्षणासाठी गेला होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ऋषिकेशने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याठिकाणी त्याच्या मित्रांनादेखील अश्रू अनावर झाले होते.



