Home » जळगाव » रेल्वे अपघाताचा संशय फोल; दगडाने ठेचून अमर सपकाळेचा खून

रेल्वे अपघाताचा संशय फोल; दगडाने ठेचून अमर सपकाळेचा खून

जळगाव : प्रतिनिधी

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत असताना पोलिसांच्या तपासातून हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बारावीचा पेपर देणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खंडेराव नगर परिसरात वास्तव्यास असलेला अमर सपकाळे हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शनिवारी तो छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे गेला होता. सायंकाळी जळगावात परतल्यानंतर तो घरी न जाता रात्रीच्या सुमारास खंडेराव नगराजवळील उड्डाणपुल परिसरात गेला. त्यावेळी रेल्वे रुळांच्या मधील मोकळ्या जागेत दोन तरुण सिगारेट ओढत बसले होते. दारूच्या नशेत असलेल्या अमरने त्यांना शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला. त्यातूनच एका तरुणाने अमरच्या डोक्यात दगड फेकून मारला.

रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अमरचा मृतदेह रेल्वे रुळांमध्ये आढळून आला. सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर इतर कोणत्याही गंभीर जखमा नसल्याने संशय बळावला. घटनास्थळी पंचनामा करताना मृतदेहापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीत त्या दगडावरील रक्ताचे नमुने मृत अमर सपकाळे यांचे असल्याचे स्पष्ट झाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा व रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबरींच्या मदतीने संशयितांचा माग काढला. त्यानुसार बारावीची परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *