जळगाव : प्रतिनिधी
पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या कारला ट्रेलरने धडक दिल्याने कारचा पूर्णपणे चुराडा होऊन मिताली सुहास पाटील (५८, रा. विनोबानगर) या ठार झाल्या. त्यांचे पती सुहास राजाराम पाटील (६०) व चालक योगेश नारायण बारी (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त कृषी अधिकारी सुहास पाटील व मिताली पाटील हे दाम्पत्य चालक योगेश बारी याच्यासह कारने (एमएच ०३, एडब्ल्यू २६६१) पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते सोमवारी जळगाव येथे घरी परत येत होते. धडक एवढी जोरात होती की, कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक अमित माळी व अन्य जण घटनास्थळी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने ट्रेलर खालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला. सुहास पाटील व योगेश बारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी हा अपघात दिसल्यानंतर घटनास्थळीच जळगावचे डॉ. महेंद्र काबरा यांनी प्राथमिक उपचार केले. अजिंठा लेणी टी पॉईट नजीक मागून येणाऱ्या ट्रेलरवरील (एमएच २१, बीवाय ४९१६) चालकाचे नियंत्रण सुटले व ते थेट कारवर येऊन धडकले. अपघातानंतर अजिंठा घाटात वाहतूक खोळंबली होती.
