जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील मामलदे येथून चोपड्याकडे दुचाकीने जात असलेल्या अमोल पाटील व पृथ्वीराज पाटील या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मामलदे फाट्याजवळ घडली.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मामलदे येथील अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय २५) व पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय २३) हे दोघे यामाहा कंपनीच्या स्पोर्ट्स बाईकवरून १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मामलदे येथून चोपड्याकडे येत होते. मामलदे फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर धडकली. या दुर्दैवी अघातात दुचाकी स्वार अमोल पाटील व पृथ्वीराज पाटील हे दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉ. स्वप्ना पाटील यांनी दोघांनाही तपासून मयत घोषित केले. या वेळी मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. या वेळी रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, पो.नि. मधुकर साळवे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. मयत दोघा तरुणांवर १७ रोजी मामलदे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मामलदे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत पृथ्वीराज पाटील याचे सुरत येथे कापड दुकान असून त्याने दसऱ्याच्या दिवशी नवी स्पोर्ट्स बाईक घेतली होती. दरम्यान दिवाळीनिमित्त तो दोन दिवसांपूर्वीच मामलदे येथील घरी आला होता. तर १६ रोजी मयत अमोल सोबत नवी बाईक वरुन जातांना दुर्दैवी अपघातात त्या दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच काहिही मदत लागल्यास संपर्क करण्यास सांगितले. तसेच विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आ. कैलास पाटील, सभापती नरेंद्र पाटील, शशिकांत पाटील, देवेंद्र पाटील, शुभम चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी रुग्णालयात उपस्थित होते.
