अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गलवाडे खुर्द येथे मुलांवर तलवारी उगारून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील गलवाडे येथील निखिल रतीलाल पाटील याने फिर्याद दिली आहे. निखिल पाटील हा ३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाबाहेर ग्राऊंडवर क्रिकेट खेळत होता. या वेळी शेखर शेषराव पाटील याने मैदानावर बैलगाडी आणली. तर मुलांनी या संदर्भात त्याचा जाब विचारला असता बैलगाडीत बसलेले गलवाडे येथील चंद्रशेखर शेषराव पाटील, दीपक नारायण पाटील, तेजस नामदेव पाटील तर धुळे जिल्ह्यातील भोकरवाडी येथील उमाकांत दगडू भदाणे हे सर्व गाडीखाली उतरले. त्यानंतर गोणीत ठेवलेल्या तलवारी काढून चंद्रशेखर याने निखिलवर तलवार उगारली. त्याने तलवार हाताने अडवल्याने त्याच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. तसेच त्यांनी निखिल व त्याच्या लहान भावाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर निखिलच्या काकाने घटनास्थळी धाव घेत त्यांच्याकडून चार ही तलवारी घेऊन मारवड पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. या प्रकरणी चारही जणांविरूद्ध विनापरवाना शस्त्र बाळगणे व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. मुकेश साळुंखे करत आहेत.



