मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दुबई आणि अबुधाबी येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल, तर शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शुभमन गिल याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी जे अंदाज वर्तवले जात होते, ते आता खरे ठरले आहेत. त्याचे केवळ संघात पुनरागमन झाले नाही, तर त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली होती. तसेच, या कसोटी मालिकेपूर्वी आयपीएल २०२५ मध्येही त्यांनी उत्कृष्ट खेळ केला होता.
निवड समितीने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामीच्या जोडीवर विश्वास कायम ठेवला आहे. हे दोघेही टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संघासाठी सलामीवीरांची भूमिका बजावत आहेत आणि त्यांनी भारताला यशही मिळवून दिले आहे. आता संघात शुभमन गिल याला स्थान मिळाल्याने, तो कोणत्या स्थानावर फलंदाजी करेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यूएईमधील परिस्थिती विचारात घेता निवड समितीने फिरकी गोलंदाजीच्या पर्यायांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. फिरकीपटू अष्टपैलू अक्षर पटेल यांच्यासह कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार केल्यास, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या व्यतिरिक्त हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे, तर वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पंड्या याचाही १५ सदस्यीय संघात समावेश आहे. राखीव यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्माला संघात स्थान मिळाले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. टी-२० स्वरूपात आयोजित होणाऱ्या या आशिया चषक स्पर्धेत भारत ‘अ’ गटात आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, यूएई आणि ओमान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबई येथे यूएई विरुद्ध होणार आहे. तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १४ सप्टेंबर रोजी याच मैदानावर खेळवला जाईल. भारताचा तिसरा आणि शेवटचा साखळी सामना १९ सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे ओमान विरुद्ध होईल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक).
