बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेने नेहमीच चर्चेत येत असणा आता एका धक्कादायक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. वडवणी (बीड) येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी वकील विनायक लिंबाजी चंडेल (वय-48) यांनी न्यायालय परिसरातील एका खोलीत खिडकीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (20 ऑगस्ट) सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेने बीडच्या न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
वडवणी स्थानिक न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या विनायक चंडेल यांनी बुधवारी सकाळी न्यायालयातील एका खोलीत गळफास लावून जीवन संपवले. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बीडच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. विनायक यांनी कोणतीही सुसाइड नोट ठेवली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
सरकारी वकिलाने थेट न्यायालय परिसरातच टोकाचा निर्णय घेतल्याने बीडमधील वकील समुदाय आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विनायक चंडेल हे आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जात होते, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. “न्यायालयातच अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
