जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महामार्गावरील स्वच्छतेच्या प्रश्नावरून नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या कडक आदेशांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या दोन्ही बाजूंना साचलेला कचरा उचलण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले असून, शनिवारी महापौरांनी “सरप्राइज व्हिजिट” देऊन स्वतः प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा आणि बांधकामाचा राडारोडा पडून होता. यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता आणि परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, महापौरांनी महानगरपालिका हद्दीतील महामार्गाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या २ दिवसांपासून काम सुरू झालेले आहे. शनिवारी अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष साफसफाई मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्यात आल्याने या मार्गावरील वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
*महापौरांची “सरप्राईज व्हिजिट”
केवळ आदेश देऊन न थांबता, महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी दुपारी मानराज पार्क परिसरात अचानक भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. महामार्गावर सुरू असलेल्या स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र कामात अधिक गती आणण्यासाठी त्यांनी उपस्थित मुकादम आणि कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. “कचरा वेगवेगळ्या ठिकाणी न ठेवता तो एका जागी गोळा करावा आणि तातडीने वाहनात भरून त्याची विल्हेवाट लावावी, जेणेकरून नागरिकांना पुन्हा त्रास होणार नाही,” असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल
शहरातील स्वच्छतेबाबत अनेक जागरूक नागरिकांनी आणि काही नगरसेवकांनी महापौरांकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या होत्या. आरोग्य विभाग कामात दिरंगाई करत असल्याचा सूर उमटत असतानाच, महापौरांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे आणि ‘फॉलो-अप’चे सर्वत्र स्वागत होत आहे. महापौरांच्या या सक्रियतेमुळे आरोग्य यंत्रणा आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे.


