पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील पोपटनगर (भोंडण तांडा) येथील ग्रामस्थ गेल्या चार महिन्यांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात जीवन जगत आहेत. गावातील मुख्य गटार नाल्यांची पाइपलाइन फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व घरांसमोर साचत असून, परिसरात गंभीर आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावातील नागरिकांनी सांगितले की, दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले असून, लहान मुलांना खेळताना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डासांचा प्रचंड उपद्रव असून, रात्री वीज नसल्याने घराबाहेर झोपणाऱ्या नागरिकांना डेंग्यू व मलेरियासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. परंतु एवढ्या गंभीर परिस्थिती असूनही, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वच्छ भारत अभियानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र येथे स्पष्ट दिसून येत आहे.
गावकरी प्रश्न विचारत आहेत, “स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच आहे का?” गावात स्वच्छतेचा मागमूस नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देऊन गटार दुरुस्ती व स्वच्छतेच्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.
