जळगाव : प्रतिनिधी
महानगरपालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप यांच्यावरील लैंगिक आरोपांमुळे छळाच्या त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पीडित महिलेने शुक्रवारी विशाखा समितीसमोर सहा पानांचा लेखी जबाब सादर केला, ज्यात डॉ. घोलप यांच्याकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर पाढाच त्यांनी वाचला. विशेष म्हणजे, डॉ. घोलप यांनी नोटरी करून माफीनामा दिल्यानंतरही त्यांचा त्रास सुरूच राहिल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे.
समितीच्या अध्यक्ष धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा जबाब देण्यात आला. पीडितेने आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एका कंत्राटदाराने चक्क पिस्तूल घेऊन कामाच्या ठिकाणी येऊन तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले, असा आरोप केला आहे. तसेच कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांकडूनही दबाव टाकण्यात आला. ‘तक्रार मागे घेतली नाही तर डॉ. घोलप काहीही करू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला मारून टाकतील’, अशा धमक्या दिल्याचे पीडितेने जबाबात नमूद केले आहे. याशिवाय, पतीच्या कामाच्या ठिकाणीही घोलप यांनी दोनवेळा जाऊन धमकावले.
पीडितेने महानगरपालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य प्रगती चोंडकाले यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. चोंडकाले यांनी तक्रार मागे घेत असल्याचा मजकूर लिहिलेला कागद आणून त्यावर सही करण्यासाठी दबाव टाकला, असे त्यांनी जबाबात नमूद केले. यामुळे तक्रार निवारण समितीवरही विश्वास राहिला नसल्याचे पीडितेने म्हटले आहे. डॉ. घोलप यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करावा. लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना बडतर्फ करावे, अशी विनंती पीडितेने विशाखा समितीला केली आहे.
