जळगाव : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या रागातून शेख शरीफ शेख रफीक (वय २६, रा. तांबापुरा) व त्यांचे मेहुणे सद्दाम फारुक मन्यार (वय ३२, रा. भडगाव) या दोघांना तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. ९ जून रोजी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापूरा परिसरात राहणारे शेख शरीफ व त्यांचे मेहुणे सद्दाम मन्यार हे दि. ९ जून रोजी मोबाईल दुरुस्तीसाठी गोलाणी मार्केटमधील एका दुकानावर गेले होते. तेथे काही वेळापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांना दिनेश, अर्जुन, गवळी फ्रुटवाला (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी शेख शरीफ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों प्रकाश पाटील करीत आहेत.



