जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेच्या धडकेत हेमंत राजेंद्र फुलमाळी (वय २६, रा. भोईटेनगर) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ घडली. युवकाजवळ असलेल्या मोबाईलवरुन त्याची ओळख पटली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यश लॉन्स समोरील भोईटे नगरात हेमंत फुलमाळी हा तरुण वास्तव्यास होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ त्याला रेल्वेची धडक लागली. यामध्ये हेमंत हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषीत केले. पोलिसांनी हेमंतच्या अंगझडती घेतली असता, त्यांना मोबाईल मिळून आला. परंतू मोबाईलचा पुर्णपणे चुराडा झाल्यामुळे तो बंद पडले होता. पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेत त्यातील सीमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकले. त्यावर आलेलया फोनवरुन मयत हेमंत याची त्याच्या काकांनी ओळख पटली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


