भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ शहर व परिसरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून मिळालेल्या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी शुभम पाटील यांनी कारवाईला मंजुरी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुभम प्रभाकर चौधरी (वय २४, रा. जयश्री नगर, भुसावळ) आणि गिरीश गोविंद चोरे (वय २३, रा. चोरे नगर) हे दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अडकले आहेत. त्यांच्याविरोधात चोरी, मारहाण, दहशत माजवणे यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांमुळे परिसरात सार्वजनिक शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने, शुभम चौधरीला जळगाव जिल्ह्याबाहेर २ वर्षांसाठी तर गिरीश चोरेला भुसावळ व भुसावळ तालुक्याबाहेर १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या आदेशानुसार, त्यांना संबंधित भागात प्रवेश करता येणार नाही.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम बसण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



