भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील मानसिंग कॉम्प्लेक्समधील मधुर वाइन शॉपमध्ये रविवारी रात्री नऊ वाजता दोन तरुणांनी गोंधळ घालत दारूचे पैसे देण्यास नकार देत दुकान मालक व कामगारांना मारहाण केली. तसेच काउंटरवर ठेवलेली तब्बल दोन हजार दोनशे रुपयांची रोकड जबरीने हिसकावून हे दोघे पसार झाले.
या घटनेबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एक तरुण दुकानात येऊन दोन क्वार्टरची मागणी करत होता. कामगारांनी दारू दिल्यानंतर पैसे मागितल्यावर त्याने संतापून शिवीगाळ व आरडाओरड सुरू केली. त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार देखील दुकानात दाखल होऊन गोंधळ घालू लागला.
त्यापैकी एकाने दुकान मालक पंकज जंगले यांच्यावर बाटली फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने कामगारांस धक्काबुक्की केली. यात मालक पंकज जंगले यांच्या हाताला गंभीर इजा झाली. दरम्यान, काउंटरवरील रोकड २२०० रुपये हिसकावून दोघे पळून गेले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी मालक पंकज घनश्याम जंगले (वय ४५, रा. आदर्शनगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे व्यापारी व हॉटेल चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
