बुलढाणा : वृत्तसंस्था
मलकापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवत हे कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरच्या एका शाळेतील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे यांनी 2024 ते 2025 दरम्यान अनेकदा 34 वर्षीय महिलेवर अत्याचार केले. आम्हाला खूश ठेव तुझ्या मुलाचा पहिला नंबर आणू, त्याला चांगले मार्क देऊ, असे आमिष या शिक्षकांनी महिलेला दाखवले होते. असे केले नाही तर तुझ्यासह मुलाला जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिला ही मूळ मोताळा तालुक्यातील असून, मुलांच्या शिक्षणासाठी मलकापूर येथे वास्तव्यास आली होती. तिने मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45)आणि अनिल थाटे (वय 47) या दोन शिक्षकांनी तिच्यावर सप्टेंबर 2024 पासून एप्रिल 2025 दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले. इंगळे हा तिच्या मुलाचा वर्गशिक्षक असून, शैक्षणिक प्रगतीचे आमिष दाखवून दोघांनीही तिला शारीरिक संबंधासाठी भाग पाडले. नकार दिल्यास मुलाला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. सततच्या त्रासामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेला अखेर धैर्य करून पोलिसांत धाव घ्यावी लागली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रार वरुन मलकापूर पोलिसांनी आरोपी समाधान इंगळे, अनिल थाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. यानंतर त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
