छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. देशसेवेच्या स्वप्नासह पोलिस होण्यासाठी आलेल्या संग्रामचा अकस्मात मृत्यू मैदानावरच झाला, ज्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांमध्ये शोककळा पसरली.

आज सकाळी सुमारे 8.15 वाजता शहरातील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर 1600 मीटर धावण्याची मैदानी चाचणी सुरू होती. संग्राम धाव सुरू करताच काही अंतर पार केल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ प्राथमिक उपचार केले आणि संग्रामला जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी तरुण मानला जात होता. पोलिस दलात दाखल होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचा त्याचा निर्धार होता. अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका किंवा तीव्र शारीरिक ताणामुळे ही घटना घडली असावी, असे अनुमान आहे. अधिकृत मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिस प्रशासनाने घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला आणि उपस्थित उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


