मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान तर उद्या मतमोजणी होणार आहे. सुमारे 1 कोटी मतदार 6042 सदस्य आणि 264 नगराध्यक्षांची निवड करतील. यासाठी पंधरा दिवस रणधुमाळी सुरू होती. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील मविआ मैदानात असली तरी बहुतांश ठिकाणी महायुतीच परस्परविरोधात असल्याचे चित्र आहे.

जळगावात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून 17 नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी 177 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून 7000 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक अखेर आज पार पडत असताना मतदानाची सुरुवात होताच अनेक ठिकाणी EVM मशीनने दगा दिल्याचे चित्र दिसून आले. पहाटेपासून मतदानासाठी उत्साहाने रांगा लावलेल्या मतदारांचा संयम तांत्रिक बिघाडामुळे सुटताना दिसला. अनेक केंद्रांवर मतदारांना प्रतिक्षा करावी लागत असून मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. काही यंत्रणा पूर्णपणे बंद पडल्यामुळे मतदान तात्पुरते थांबवावे लागले आहे. प्रशासनाकडून यंत्रणा दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी या उशीरामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुका नीट पार पडाव्यात म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आल्याचा दावा असतानाच मशीन बिघाडामुळे संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मालवण नगरपरिषद निवडणुकीत लग्न सोहळा असताना वधूने मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. मालवण भंडारी स्कूल येथे दोन वधूंनी मतदान केले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा नगरपरिषदेसाठी मतदान सुरू आहे. या दरम्यान नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.



