मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठी भाषेसंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार मनसैनिकांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी फलक तसेच मराठी भाषा वापरण्यास मनसेच्या पद्धतीने विनंती केली होती. त्यानंतर मनसेने आता मुंबई मेट्रोकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसत आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानाकाबाहेरील फलकावर इंग्रजी भाषेत नाव लिहिल्याने मनसेने इशारा दिला आहे. हे सुरू असतानाच मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर मनसेनेही प्रत्युत्तरात इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी-हिंदी वाद पेटणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मेट्रोला मराठीचा द्वेष? तातडीने फलक मराठी करावा, अन्यथा गाठ मनसेशी, असा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो 3 मधील दूसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच काही मेट्रो स्थानके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवर आली आहेत. तसेच मेट्रो प्रशासनाला आम्ही पत्र दिलेले आहे. दोन दिवसात त्यांनी नाव बदलले नाही, तर मनसे स्टाइलने उत्तर देऊ. मराठीचा विषय सुरू असताना, मेट्रोला कसला माज आला आहे? दोन दिवसात मराठीत नाव केले नाही तर आम्ही उत्तर देऊ, असा इशारा मनसेने दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात मनसैनिकांना सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जाते की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जात आहे की नाही हे तपासले तसेच हिंदी भाषिकांना देखील चांगलाच दम दिल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय पडसाद देखील उमटण्यास सुरू झाले आहेत. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी मनसेच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनी याचिकेतून केली आहे. याचसोबत राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदी भाषिकांवर मनसेचे कार्यकर्ते हल्ले करत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. ही याचिका वकील श्रीराम परक्कट यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासह मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
